वडिलाचे मुलास पत्र - एकदा नक्की वाचाच...!
वडिलाचे मुलास पत्र - एकदा नक्की वाचाच...!
अब्राहम लिंकन( अमेरिकेचे अध्यक्ष ) यांचे आपल्या मुलाबद्दल हेडमास्तरांना लिहिलेले
पत्र फार प्रसिद्ध आहे. आणि त्या पत्राचा श्री वसंत बापट यांनी केलेला स्वैर अनुवादही
अनेक शाळांध्ये हे मराठीतील पत्र फ्रेम करून दर्शनी भागात लावलेले आहे. अनेक
घरांमध्येही ते अगदी कौतुकाने लावलेले दिसते. ते एक आदर्श पत्र आहे यात काही
शंका नाही.
तसेच एक पत्र काही दिवसा पूर्वी माझ्या व्हाटस वर आले होते.
एका वडिलांनी आपल्या मुलाला लिहिलेले- अगदी वाचनीय, आणि विचार
करण्यासारखे... आजच्या काळाशी अगदी योग्य.
वयात आलेल्या प्रत्येक मुलाला पित्याने अगदी आवर्जून करावा असा उपदेश आहे
त्या पत्रात. अगदी व्यावहारीक. त्या पत्रात लिहिले आहे...
प्रत्येक वडिलाने वयात येणाऱ्या आपल्या मुलाला आवर्जुन लिहावे असे पत्र...!
एकदा हा पत्र नक्की वाचा आणि पटले तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही
वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा
वाचायलाही सांगा....
पुन्हा पुन्हा यासाठी की... ज्यावेळी जशी मानसिक स्थिती असेल तसा प्रत्येक
वेळी वेगळा अर्थ समजून येईल.
माझ्या लाडक्या मुला... मी तुला हे असे पत्र लिहित आहे... तू बघ... वाच...
आणि ठरव...
प्रिय मुला... जगणे.... नशीब.... आणि अपघात या तीन गोष्टी कधी
घडतील आणि कधी बिघडतील हे सांगता येत नाही.
सगळेच अंदाज राहते... आपण इतके दिवस जिवंत राहू... किंवा एवढे वर्ष
माझे आयुष्य आहे... हे कुणीच सांगू नाही शकत. त्यामुळे मुला...
काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
मी तुझा वडील आहे... आज या पत्राद्वारे तुला मी जे सांगणार ते दुसरा
कदाचित कुणीही कधीच सांगणार नाही.
मी माझ्या जीवनात ज्या काही चुका केल्या... जर का त्या तुला टाळता आल्या
तर तुझ्या जीवनात तुला शाररीक आणि मानसिक त्रास बराच कमी होईल...
म्हणून तुला काही गोष्टी सांगत आहे...
आयुष्यात कुणाचाही द्वेष करू नकोस. सगळे तुझ्याशी नेहमी चांगलेच वागले पाहिजे
अशी अपेक्षा ठेऊ नकोश... तसेच दुसऱ्यावर आपण तशी सक्तीही करू शकत नाही.
त्यामुळे कुणी आपल्या सोबत असेच का वागतात असे म्हणून रागाऊ नको.
मुला तुझ्या सोबत नेहमीच चांगले वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या
आईचीच आहे. जेंव्हा जी लोकं तुझ्याशी चांगले वागतात... त्यांच्याशी तु चांगलेच
वाग. पण हे नेहमी लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या
स्वार्थापोटी करतो. त्यामुळे जी माणसे गोड बोलतात, तुझ्यासोबत नेहमी चांगलीच
वागतात त्यांना तू खरोखरच आवडतो असे काही नसेलही.
जरा माणसे तपासून बघ...
पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई नको करू.
कुणाचेच कुणाशीही काहीही अळत नाही... आणि कुणासाठी कुणाचे जगणेही
थांबत नाही. त्यामुळे माणसे तुला सोडून जातील... नाकारतील... झिडकारतील...
किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलेस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील.
तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपले जगणे थांबत नाही.
कधीच नाही.
जीवन फार लहान आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे जर का तू
आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणेच तुला सोडून जाईल.
त्यापेक्षा आज मनापासून... भरभरून जग... आनंदी राहा...
प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही
बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा
धीर धर. काळाच्या मलमाने या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे
तेच सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगले असे समजू नकोस आणि प्रेमभंग झाला
म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
या जगात अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडले... तरी ही ते यशस्वी झाले
अशा तू खूप कहाण्या वाचल्या असशीलच...! पण याचा अर्थ असा नाही की...
शिक्षण सोडले की तूही यशस्वी होशील. माहिती... ज्ञान... हे एक शस्त्र आहे...
हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे अगदीच खरे पण...
कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करावी लागतेच ना...!
माझी अशी अपेक्षाच नाही की... मी म्हातारा झाल्यावर तू माझा सांभाळ करावा...!
मी ही काही तुला आयुष्यभर पोसणार नाहीच आहे.
तू स्वत:च्या पायावर उभा होत पर्यंत तुला आधार देणे ही माझी जबाबदारी आहे.
त्यानंतर तुला बसमधून फिरायचे की महागड्या कार मधून.... गरीबच राहायचे आहे...
की श्रीमंत व्हायचे आहे... हा निर्णय तुझा तूच घ्यायचा.
बाळा...! आणखी एक... मी पण खुपदा लॉटरीचे तिकीट काढले... पण मला ती
लॉटरी कधीच लागली नाही रे... लक्षात ठेव एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही.
श्रीमंत व्हायचे आहे तर.. मेहनत तर करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच
मिळत नाही.
बाळा... कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल की नाही हे माहीत नाही...
पण हे पत्र तुझ्या जीवनाची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्के हं...!
म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस...
या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव आणि वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच....
तुझेच वडील
Comments
Post a Comment